Sunday, April 23, 2017

स्वप्नाची समाप्ती

शेवटी एकदाचं ते स्वप्न मनाच्या त्या सर्वात खोल, शेवटच्या कोपऱ्यात आलं.

येथे प्रवास संपला. आता सुरु होते फक्त वाट पाहाणे!

नविन काही घडत असले की मनातल्या सगळ्याच गोष्टींची आवराआवर होते, त्यातच हे स्वप्न आज येथे येउन पोहोचले होते. तसे ते एक नाजुकसे, छोटेसे पण धीट स्वप्न होते - एका लहान मुलाच्या मनातले लाल रंगाच्या सायकलचे स्वप्न! लहानपणी हजारोने स्वप्न येतात व लगेच नाहीशी पण होतात. का कोणास ठाउक, पण हे स्वप्न टिकून राहीले- बरीच वर्षे. आपणच असे अधांतरी का राहीलो? पुर्णही नाही झालो आणि नाहीसे पण नाही झालो. अजुन किती दिवस वाट पाहायची? असे खुप सारे प्रश्न स्वप्नाला छळत होते.

मनाच्या त्या कोपऱ्याबद्दल स्वप्नाने बय्राच गोष्टी ऐकल्या होत्या. नको असलेल्या भाव-भावना, विचार, अनुभव असे काय काय असते म्हणे येथे. अडगळीची जागाच जणु! स्वप्नाने आजुबाजुला बघितले- काळ्या धुरासारखी उग्र दिसणारी खुप सारी मंडळी होती. पण एकही स्वप्न नव्हते. 'इथे स्वप्न का नाही?' असे त्याला विचारावे वाटले...पण उत्तर काय असेल हे उमजुन त्याने शांत राहायचे ठरवले.

स्वप्नाला आता इथे येउन काही दिवस लोटले होते. पुढे आपले काय होणार याची भीती पण वाटत होती. पण आता आहे त्या परिस्थितीला स्वीकारत त्याने वाट पाहायचे ठरवले.

"मी तुला ओळखतो"
स्वप्नाने वळुन पाहीले तर एक काळी आकृती त्याच्याशीच बोलत होती.
"...."
"तुझा जन्म झाला तेव्हा मी तिथेच होतो"
स्वप्नाला त्या आवाजातली आपुलकी जाणवुन जरा बरे वाटले.
"तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखले नाही"
"अरे तु मला कसा ओळखणार? तुमचे जग वेगळे आणि आमचे जग वेगळे"
"म्हणजे?" स्वप्नाला काही समजले नाही.
"आपण ज्याच्या मनात राहतो, तो लहान असताना त्याला त्याच्या शेजारच्या मुलाची सायकल खुपच आवडली. त्याला ना विचारताच त्याने ती चालवुन पाहीली. 'चोर,चोरी' कसे काय काय त्याला ऐकुन घ्यावे लागले आणि वर घरचा मार पडला तो वेगळाच. अपमान, अपराधीपणाची भावना किंवा बाहेरच्या जगाचा का काय म्हणतात ना तो पहिला अनुभव म्हणजे मी. त्या दिवशी रात्री झोपताना रडत रडतच त्याने स्वतःच्या सायकलचे स्वप्न पाहीले आणि ते म्हणजे तु."
स्वप्नाला हे सारे नविनच होते. त्याला आजपर्यंत जी सोबत मिळाली ती इतर स्वप्नांनचीच होती. स्वप्न असणं आणि पुर्ण होणं एवढच त्याला माहीत. आपण ज्याच्या मनात राहतो त्या बद्दल आपल्याला काहीच माहीती नाही हे स्वप्नाला पहिल्यांदा जाणवले. आता स्वप्नाच्या वाट पाहाण्याला एक दिशा मिळाली होती.

स्वप्नाने त्या कोपऱ्यातील बाकीच्या मंडळींशी बोलायचे ठरवले.  एका मोठ्या काळ्या ढगाशी तो बोलु लागला.
"तुम्ही कोण?"
"मी कोण? आपण असं करु, मी तुला माझी गोष्ट सांगतो मग तुच आोळख मी कोण ते."
" "
"तर या लहान मुलाबरोबरच - लहान कसला, आता तर तो तरुण माणुस झालाय- माझा जन्म झाला. तो मोठा झाला तसाच मी ही मोठा झालो. माझी खुप वेगवेगळी रुपं आहेत. लहाणपणी अंधारात जाण्यापासुन मीच त्याला अडवत होतो. टरबुजाची बी खाल्ल्यावर पोटात टरबुजाचं झाड येणार अस माझ्यामुळेच त्याला वाटले. गृहपाठ न करता शाळेत जाताना मी कायम त्याच्यासोबतच असायचो. पण पुढे सगळच एकदम बदललं"  काळ्या ढगाचा कौतुकाचा स्वर बदलुन थोडा उदास झाला.
"एका अपघातात या मुलाचं आई बाबा गेले आणि त्याचे पुर्ण आयुष्यच बदलुन गेले. त्या नंतरच्या काही दिवसात माझ्यातही काही कायमचे बदल झाले....माझा आकार वाढला आणि रंग अजुन गडद झाला. तेव्हा बराच काळ मी मनाच्या वरच्या कप्प्यातच राहायचो. हळु हळु मग मी इथे आलो आणि इथेच राहीलो. अजुनही वेगवेगळ्या रुपात माझा वावर असतोच. काय काही लक्षात येतंय का मी कोण ते?" काळ्या ढगाने हसुन विचारले आणि मग स्वत:च उत्तर दिले "मी म्हणजे भीती".

" आणि मी म्हणजे राग....."  काळया पाषाणासारख्या दिसणारी अजुन एक आकृती बोलली.
"पण नेहमी येणारा तो मनाच्या वरच्या थरातला राग वेगळा आणि मी वेगळा. लहानपणी नातेवाईकांकडे आश्रीता सारखे राहताना झालेल्या अपमानांचा राग, दुसऱ्यांची जुनी पुस्तके, जुने कपडे वापरावे लागले याचा राग, अनेक स्वप्न मोडुन पडतानाचा राग आणि हवी ती गोष्ट कधीच न मिळण्याचा राग म्हणजे मी"
स्वप्नाच्या चेहेऱ्यावरचे भाव पाहुन राग पुढे म्हणाला "अरे, आमच्या दिसण्यावर जाऊ नकोस. शेवटी काय आपण सारे विचारांचेच रुपं. आणि हो मी पण तुझ्या सारखीच वाट पाहतोय मुक्त होण्याची. कदाचीत आपल्या दोघांचीही सुटका तुझ्याच हातात असेल".

प्रश्न, प्रश्न आणि नुसतेच नवनविन प्रश्न!!!!

हळु हळु स्वप्नाची आता कोपऱ्यातील सर्वांशी ओळख झाली - भीती, राग, अपमान, नकार असे काय काय होते तिथे. एकमेकांसोबत राहणाऱ्या आणि एकमेकांसोबत गुंतलेल्या हजारो गोष्टी. आपल्या इथे येण्याला नक्कीच काहीतरी अर्थ आहे याची स्वप्नाला खात्री पटली.

स्वप्न विचार करु लागले - लहानपणीच्या अवघड परिस्थितीत कदाचीत आपण या मुलाला आणि त्याने आपल्याला जगवले. म्हणुनच त्याने आपले स्वप्नाचे जग आणि खरं जग वेगवेगळे ठेवले. पण आज या माझ्या अस्तित्वाला अर्थ काय? आज परिस्थीती चांगली असताना मी कधीच पुर्ण झालो असतो...पण झालो नाही. का?
आणि या रागाचा आणि माझा काय संबंध? तो का वाट पाहतोय?
'राग' आणि 'स्वप्न' ?
'माझा राग' आणि 'माझं स्वप्न' ?
'माझं'?
'मी'?
फक्त 'मी'?
फक्त 'माझं'? !!!!!!!
एका क्षणात स्वप्नाला सारे समजले. सारेच प्रश्न सुटले.
तो रागाकडे अपेक्षेने पाहु लागला. पाषाणा सारखा तो राग समाधानाने हळु हळु धुरासारखा होत निवळु लागला. स्वप्नातही बदल होऊ लागले.....स्वप्नाला पंख फुटले आणि स्वप्न मनाच्या वरच्या थरांकडे प्रवासाला निघाले.
वाट पहाणे आता संपले होते!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तो तरुण मुलगा गाडीत बसुन शाळेकडे टक लाऊन बघत होता. शेवटची घंटा झाली आणि वारुळातुन मुंग्या बाहेर पडाव्यात तशी सगळी मुले वर्गाबाहेर पडली. पण नेहेमी प्रमाणे शाळेबाहेर न जाता मैदानावरच थांबली. मैदानात एका रांगेत व्यवस्थीत लावलेल्या नव्या कोऱ्या सायकलींजवळ मुलं गोळा होऊ लागली.

शिक्षक आले आणि त्यांनी शाळेच्या एका माजी विद्यार्थाने काही मुलांना नविन सायकली दिल्याचे जाहीर केले.

शिक्षक बाजुला होताच मुलांच्या उत्साहाला उधाण आलं. काही मुलं सायकलवर मैदानात चक्कर मारत होती, काही घोळक्याने नविन सायकल बघत होती, कुठे डबलसीट, कुठे शर्यत, कुठे रोज शाळेत कोण कोणासोबत येणार हे ठरत होते तर कुठे सुट्टीच्या सायकल सहलींचे बेत!

तो तरुण मुलगा शाळेबाहेरुन हे सारे बघत होता. डोळ्यात जमलेल्या पाण्याने जेव्हा सारेच धुसर दिसायला लागले तेव्हा त्याने डोळे पुसले व तो पुन्हा मैदानाकडे बघायला लागला.

मुलांच्या त्या गर्दीतच त्याचे लक्ष एका लहान मुलाकडे गेले. चेहेरा खुप जुना ओळखीचा होता.
सायकलवर मैदानात चक्कर मारताना त्याचा आनंद अगदी ओसंडुन वाहात होता.

हळु हळु मैदानावरची गर्दी कमी होत गेली. थोड्या वेळाने शाळेचा शिपाईही शाळेला कुलुप लाऊन गेला.

आता तिथे ते दोघेच उरले होते - गाडीत बसलेला तो तरुण आणि शाळेच्या मैदानात सायकल चालवणारा तो छोटा मुलगा.

सायकलचा रंग - लाल!

स्वप्न पुर्ण होतात?
स्वप्न पुर्ण होतात!

1 comment:

आशिष देवडे said...

खूप छान लिहिलं आहेस पराग...आपली स.भु. शाळा डोळ्यासमोर आली शेवटच्या paragraph मध्ये...लिहीत रहा.