Sunday, April 23, 2017

स्वप्नाची समाप्ती

शेवटी एकदाचं ते स्वप्न मनाच्या त्या सर्वात खोल, शेवटच्या कोपऱ्यात आलं.

येथे प्रवास संपला. आता सुरु होते फक्त वाट पाहाणे!

नविन काही घडत असले की मनातल्या सगळ्याच गोष्टींची आवराआवर होते, त्यातच हे स्वप्न आज येथे येउन पोहोचले होते. तसे ते एक नाजुकसे, छोटेसे पण धीट स्वप्न होते - एका लहान मुलाच्या मनातले लाल रंगाच्या सायकलचे स्वप्न! लहानपणी हजारोने स्वप्न येतात व लगेच नाहीशी पण होतात. का कोणास ठाउक, पण हे स्वप्न टिकून राहीले- बरीच वर्षे. आपणच असे अधांतरी का राहीलो? पुर्णही नाही झालो आणि नाहीसे पण नाही झालो. अजुन किती दिवस वाट पाहायची? असे खुप सारे प्रश्न स्वप्नाला छळत होते.

मनाच्या त्या कोपऱ्याबद्दल स्वप्नाने बय्राच गोष्टी ऐकल्या होत्या. नको असलेल्या भाव-भावना, विचार, अनुभव असे काय काय असते म्हणे येथे. अडगळीची जागाच जणु! स्वप्नाने आजुबाजुला बघितले- काळ्या धुरासारखी उग्र दिसणारी खुप सारी मंडळी होती. पण एकही स्वप्न नव्हते. 'इथे स्वप्न का नाही?' असे त्याला विचारावे वाटले...पण उत्तर काय असेल हे उमजुन त्याने शांत राहायचे ठरवले.

स्वप्नाला आता इथे येउन काही दिवस लोटले होते. पुढे आपले काय होणार याची भीती पण वाटत होती. पण आता आहे त्या परिस्थितीला स्वीकारत त्याने वाट पाहायचे ठरवले.

"मी तुला ओळखतो"
स्वप्नाने वळुन पाहीले तर एक काळी आकृती त्याच्याशीच बोलत होती.
"...."
"तुझा जन्म झाला तेव्हा मी तिथेच होतो"
स्वप्नाला त्या आवाजातली आपुलकी जाणवुन जरा बरे वाटले.
"तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखले नाही"
"अरे तु मला कसा ओळखणार? तुमचे जग वेगळे आणि आमचे जग वेगळे"
"म्हणजे?" स्वप्नाला काही समजले नाही.
"आपण ज्याच्या मनात राहतो, तो लहान असताना त्याला त्याच्या शेजारच्या मुलाची सायकल खुपच आवडली. त्याला ना विचारताच त्याने ती चालवुन पाहीली. 'चोर,चोरी' कसे काय काय त्याला ऐकुन घ्यावे लागले आणि वर घरचा मार पडला तो वेगळाच. अपमान, अपराधीपणाची भावना किंवा बाहेरच्या जगाचा का काय म्हणतात ना तो पहिला अनुभव म्हणजे मी. त्या दिवशी रात्री झोपताना रडत रडतच त्याने स्वतःच्या सायकलचे स्वप्न पाहीले आणि ते म्हणजे तु."
स्वप्नाला हे सारे नविनच होते. त्याला आजपर्यंत जी सोबत मिळाली ती इतर स्वप्नांनचीच होती. स्वप्न असणं आणि पुर्ण होणं एवढच त्याला माहीत. आपण ज्याच्या मनात राहतो त्या बद्दल आपल्याला काहीच माहीती नाही हे स्वप्नाला पहिल्यांदा जाणवले. आता स्वप्नाच्या वाट पाहाण्याला एक दिशा मिळाली होती.

स्वप्नाने त्या कोपऱ्यातील बाकीच्या मंडळींशी बोलायचे ठरवले.  एका मोठ्या काळ्या ढगाशी तो बोलु लागला.
"तुम्ही कोण?"
"मी कोण? आपण असं करु, मी तुला माझी गोष्ट सांगतो मग तुच आोळख मी कोण ते."
" "
"तर या लहान मुलाबरोबरच - लहान कसला, आता तर तो तरुण माणुस झालाय- माझा जन्म झाला. तो मोठा झाला तसाच मी ही मोठा झालो. माझी खुप वेगवेगळी रुपं आहेत. लहाणपणी अंधारात जाण्यापासुन मीच त्याला अडवत होतो. टरबुजाची बी खाल्ल्यावर पोटात टरबुजाचं झाड येणार अस माझ्यामुळेच त्याला वाटले. गृहपाठ न करता शाळेत जाताना मी कायम त्याच्यासोबतच असायचो. पण पुढे सगळच एकदम बदललं"  काळ्या ढगाचा कौतुकाचा स्वर बदलुन थोडा उदास झाला.
"एका अपघातात या मुलाचं आई बाबा गेले आणि त्याचे पुर्ण आयुष्यच बदलुन गेले. त्या नंतरच्या काही दिवसात माझ्यातही काही कायमचे बदल झाले....माझा आकार वाढला आणि रंग अजुन गडद झाला. तेव्हा बराच काळ मी मनाच्या वरच्या कप्प्यातच राहायचो. हळु हळु मग मी इथे आलो आणि इथेच राहीलो. अजुनही वेगवेगळ्या रुपात माझा वावर असतोच. काय काही लक्षात येतंय का मी कोण ते?" काळ्या ढगाने हसुन विचारले आणि मग स्वत:च उत्तर दिले "मी म्हणजे भीती".

" आणि मी म्हणजे राग....."  काळया पाषाणासारख्या दिसणारी अजुन एक आकृती बोलली.
"पण नेहमी येणारा तो मनाच्या वरच्या थरातला राग वेगळा आणि मी वेगळा. लहानपणी नातेवाईकांकडे आश्रीता सारखे राहताना झालेल्या अपमानांचा राग, दुसऱ्यांची जुनी पुस्तके, जुने कपडे वापरावे लागले याचा राग, अनेक स्वप्न मोडुन पडतानाचा राग आणि हवी ती गोष्ट कधीच न मिळण्याचा राग म्हणजे मी"
स्वप्नाच्या चेहेऱ्यावरचे भाव पाहुन राग पुढे म्हणाला "अरे, आमच्या दिसण्यावर जाऊ नकोस. शेवटी काय आपण सारे विचारांचेच रुपं. आणि हो मी पण तुझ्या सारखीच वाट पाहतोय मुक्त होण्याची. कदाचीत आपल्या दोघांचीही सुटका तुझ्याच हातात असेल".

प्रश्न, प्रश्न आणि नुसतेच नवनविन प्रश्न!!!!

हळु हळु स्वप्नाची आता कोपऱ्यातील सर्वांशी ओळख झाली - भीती, राग, अपमान, नकार असे काय काय होते तिथे. एकमेकांसोबत राहणाऱ्या आणि एकमेकांसोबत गुंतलेल्या हजारो गोष्टी. आपल्या इथे येण्याला नक्कीच काहीतरी अर्थ आहे याची स्वप्नाला खात्री पटली.

स्वप्न विचार करु लागले - लहानपणीच्या अवघड परिस्थितीत कदाचीत आपण या मुलाला आणि त्याने आपल्याला जगवले. म्हणुनच त्याने आपले स्वप्नाचे जग आणि खरं जग वेगवेगळे ठेवले. पण आज या माझ्या अस्तित्वाला अर्थ काय? आज परिस्थीती चांगली असताना मी कधीच पुर्ण झालो असतो...पण झालो नाही. का?
आणि या रागाचा आणि माझा काय संबंध? तो का वाट पाहतोय?
'राग' आणि 'स्वप्न' ?
'माझा राग' आणि 'माझं स्वप्न' ?
'माझं'?
'मी'?
फक्त 'मी'?
फक्त 'माझं'? !!!!!!!
एका क्षणात स्वप्नाला सारे समजले. सारेच प्रश्न सुटले.
तो रागाकडे अपेक्षेने पाहु लागला. पाषाणा सारखा तो राग समाधानाने हळु हळु धुरासारखा होत निवळु लागला. स्वप्नातही बदल होऊ लागले.....स्वप्नाला पंख फुटले आणि स्वप्न मनाच्या वरच्या थरांकडे प्रवासाला निघाले.
वाट पहाणे आता संपले होते!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तो तरुण मुलगा गाडीत बसुन शाळेकडे टक लाऊन बघत होता. शेवटची घंटा झाली आणि वारुळातुन मुंग्या बाहेर पडाव्यात तशी सगळी मुले वर्गाबाहेर पडली. पण नेहेमी प्रमाणे शाळेबाहेर न जाता मैदानावरच थांबली. मैदानात एका रांगेत व्यवस्थीत लावलेल्या नव्या कोऱ्या सायकलींजवळ मुलं गोळा होऊ लागली.

शिक्षक आले आणि त्यांनी शाळेच्या एका माजी विद्यार्थाने काही मुलांना नविन सायकली दिल्याचे जाहीर केले.

शिक्षक बाजुला होताच मुलांच्या उत्साहाला उधाण आलं. काही मुलं सायकलवर मैदानात चक्कर मारत होती, काही घोळक्याने नविन सायकल बघत होती, कुठे डबलसीट, कुठे शर्यत, कुठे रोज शाळेत कोण कोणासोबत येणार हे ठरत होते तर कुठे सुट्टीच्या सायकल सहलींचे बेत!

तो तरुण मुलगा शाळेबाहेरुन हे सारे बघत होता. डोळ्यात जमलेल्या पाण्याने जेव्हा सारेच धुसर दिसायला लागले तेव्हा त्याने डोळे पुसले व तो पुन्हा मैदानाकडे बघायला लागला.

मुलांच्या त्या गर्दीतच त्याचे लक्ष एका लहान मुलाकडे गेले. चेहेरा खुप जुना ओळखीचा होता.
सायकलवर मैदानात चक्कर मारताना त्याचा आनंद अगदी ओसंडुन वाहात होता.

हळु हळु मैदानावरची गर्दी कमी होत गेली. थोड्या वेळाने शाळेचा शिपाईही शाळेला कुलुप लाऊन गेला.

आता तिथे ते दोघेच उरले होते - गाडीत बसलेला तो तरुण आणि शाळेच्या मैदानात सायकल चालवणारा तो छोटा मुलगा.

सायकलचा रंग - लाल!

स्वप्न पुर्ण होतात?
स्वप्न पुर्ण होतात!

Thursday, November 17, 2011

एक गोष्ट अर्धवट राहिलेली

एक गोष्ट अर्धवट राहिलेली
सुरूवात झालेली आणि शेवट माहिती असलेली

पण मधेच थोडी अडखळलेली-भांबावलेली आणि दुखावलेली सुद्धा
शब्दांच्या डोंगरातुन मूकपणे काही सांगणारी
घटनांच्या श्रुंखलात राहुनही मुक्त असणारी

सुरूवात आणि शेवट यांच्या मधेच अडकलेली गोष्ट पूर्ण कशी करावी?
शब्दांनी,भावनांनी,घटनांनी की नुसत्त्याच चित्रांनी मधली जागा भरावी?

तशी तिला शेवटापर्यंत जाण्याची घाई नाही
"अरे वा!" किंवा "अरे रे!!" यांचं आकर्षण नाही
छोट्या निरर्थक घटनांचा राग नाही
मोठ्या अवघड शब्दांचा सॊस पण नाही
पण गोष्टीतला प्रत्येक शब्द मात्र आरश्याचा तुटलेला तुकडा असावा,
खुपला टोचला तरी स्वत:चा ’एकच’ चेहरा त्यात दिसावा

एक गोष्ट प्रामाणिकपणे पूर्ण होण्याची वाट बघणारी
सुरूवात झालेली आणि शेवट माहिती असलेली.

Thursday, August 20, 2009

गाता रहे मेरा दिल...........

एखादं नविन गाणं एकदम डोक्यात अडकतच.
कधी शब्द आठवतात तर कधी चाल........
दिवसभर शब्द आणि चाल यांचा लपंडाव चालुच राह्तो मनात.
आणि कधीतरी एकदम अचानक एखादं कडवे किंवा एखादी ओळ सुद्धा मनात Perfect जमुन येते - शब्द,चाल आणि original गायकाचा आवाज डोक्यात घुमु लागतो.
ये हुई ना बात!!

"A melody is like seeing someone for the first time. The physical attraction.But then, as you get to know the person, that's the lyrics. Their story. Who they are underneath. It's the combination of the 2 that makes it magical."
(From Movie: Music & Lyrics)

खरं सांगायचं तर गाण्याची खरी मजा अशी त्या गाण्याशी हळु हळु ओळख करुन घेतानाच येते.

Sunday, June 1, 2008

अकिलिज Vs(?) ओडिसियस

अकिलिज - ओडिसियस कसा आहेस? तुला भेटुन आ‍नंद झाला. तुझ्या प्रवासाच्या खुप गोष्टी ऐकल्या मी. ट्रॉयच्या युध्दानंतर इथाकाला परत जाताना आलेले अनुभव – चित्र-विचित्र राक्षस, क्षणोक्षणी मृत्युला फसवणारे तुझे धैर्य – सारे अद्भुतच!

ओडिसियस - अकिलिज, का लाजवतो आहेस मला? एका साधारण माणसाची जगण्यासाठी केलेली धडपड ती – मांजर उंदराचा खेळ तो. चित्र-विचित्र राक्षसांशी लढताना, स्वत:च्याच सहकार्यांना धोका देताना , भिती, धैर्य या शब्दांचे अर्थच बदलणारी माझी गोष्ट. तुझ्यासारख्या स्वत: मृत्युला स्वीकारणाऱ्या समोर तर मला शरमुन जायला होते. तुला तर वरदान होते - ट्रॉयच्या युध्दात लढु नको आणि आणि जगातील सारी सुखे भोग आणि जर लढलास तर युध्द संपण्यापुर्वीच तुझा मृत्यु होइल पण जगात नेहेमीसाठी तुझी किर्ती अमर होइल.

अकिलिज – मित्रा , त्याला तु वरदान म्हणतोस? तो तर एक शाप होता. एक सैनिक असुन लढ्लो नसतो तर त्यानंतर मिळणाऱ्या जीवनात सुखी झालो असतो मी? आयुष्य तरि काय आहे - फक्त एक एक क्षण जोडणे? मी दुसरा पर्याय निवडला – लढण्याचा आणि मऱण्याचा - आणि हो लोकांच्या आठवणीत अमर होण्याचा.

ओडिसियस – पण तुला एक विचारु, मरणाला कवटाळ्याची तुझी इच्छा म्हणजे जगण्याशी केलेली प्रतारणा नव्हती का?

अकिलिज - मित्रा, क्षणोक्षणी साथ देणारे हे आयुष्य, शेवटच्या क्षणी आपल्याला मृत्युच्या स्वाधीन करते - या फसव्या जीवनाशी कसली आली आहे प्रतारणा? आपणच फसवले जात नाही का ?

ओडिसियस – खरं आहे. पण त्यामुळेच माझी जगण्याची धडपड तुला केविलवाणी वाटत नाही का?

अकिलिज- नाही वाटत. का ते नाही सांगत पण तुला उत्तर म्हणुन एक प्रश्न विचारतो. प्रत्येक वेळेस मृत्यु काही क्षणावर उभा असताना असा काय होतं जे तुला जगण्यासाठी खुणावत होते? न लढता मृत्युला स्वाधीन होणे सगळ्यात सोपे होते पण तरिही तसे करण्यापासुन तुला काय परावॄत्त करत होते?

ओडिसियस – माझी बायको आणि मुलगा इथाका मधे माझी वाट बघत होते आणि त्यांना भेटण्याची, त्यांच्यासोबत सुखात आयुष्या घालवण्याची इच्छा होती हे खरे आहे. पण केवळ हेच एक कारण होते असे मला आज वाटत नाही – अजुन काहितरी होते. मृत्युचा काळा जबडा दिसला की मला प्रकाश देणारा सुर्य आणि सुदंर सुर्योदय आठवायचा, समुद्राच्या साक्षीने बुडणारा सुर्यास्त आठवायचा, आकाशातील ताऱ्यांचा घुमट डोळ्यासमोर उभा रहायचा, नाजुक फ़ुले आणि त्यांचे रंग, पाऊस, वारा या आणि अश्या अगणित गोष्टी आठवायच्या. मला वाटते या साऱ्या गोष्टीच मला त्यांच्या पाशात अडकवित होत्या. मला न पाहिलेल्या मृत्युचे भय होते आणि पाहिलेल्या या जगाबद्द्ल प्रेम. तेच मला जगवत आले बहुतेक आणि त्यासाठी मी वेळोवेळी मोठी किंमत मोजली.

अकिलिज – तुला म्हणालो होतो ना मी, तुझे उत्तर तुला मिळेल म्हणुन.

ओडिसियस - अकिलिज, आपण दोघेही आता जीवन मरणाच्या पलिकडे गेलो आहोत. आज लोक आपल्याला ग्रीक गोष्टींचे नायक म्हणुन ओळखतात . मृत्युला निर्भयपणे कवटाळणारा तु आणि जगण्यासाठी काहीही करणारा मी – इतकी टोकाची परस्परविरुद्ध भुमिका असणारे आपण दोघेही नायक कसे? कोणाची भुमिका बरोबर कोण चुक?

अकिलिज - मित्रा, मृत्युला स्वीकारणे किंवा मृत्युला वारंवार फसावणे या कारणासाठी आपले महत्व नाहीच. जगताना लोक कधी मरणारच नाही असे समजुन जगतात आणि मरताना कधी जगलेच नाही असे भासवत रड्त, घाबरत मरतात. मित्रा, आपण नायक होतो आणि आहोत कारण जगणे, मरणे यापेक्षा आपण आपल्या मनाला जे पटले तेच केले. पुन्हा तशी वेळ आलिच तर मी लढण्याचा आणि मरण्याचाच पर्याय निवडेल आणि तु जगण्याचाच. आपल्या मनाशी प्रामणिक राहिलो हेच आपले कर्तुत्व.

ओडिसियस - अकिलिज, मृत्यु म्हणजे कर्माची समाप्ती. आपले पुर्ण जीवन आपल्या डोळ्यासमोर असते आणि आपण त्यातील काहीच बदलु शकत नाही. चुक-बरोबर,चांगले-वाइट यांची गोळा-बेरिज होते आणि शेवटी कहीतरी उरतेच. हे जे उरलेले असते ते जर समाधान देणारे असेल तर तो स्वर्ग आणि हेच जर सतावणारे असेल, मन खाणारे असेल तर तो नर्क! जगताना क्षणोक्षणी आपल्याला हे बदलण्याची संधी असते – पण मृत्यु नंतरच माणसाला याची सत्यता पटते.

अकिलिज – बरोबर आहेस तु. आपल्या मनामध्येच स्वर्ग आणि नर्क आहे याची जगताना माणसाला जाणिव नसते. पण अश्या अनेक गोष्टी त्याला माहिती नसतात – आपण का जगतोय? कशासाठी मरतोय? सगळा अंधारातील प्रवास. जगण्याला अर्थ आहे का नाही? कोण देणार याचे उत्तर? डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असते? का सगळे आपल्या मनाचे खेळ ? सगळ्याला अर्थ देणारे जर आपले मनच असेल तर मग या जगण्याला पण आपणच अर्थ का देऊ नये? स्वत:वर विश्वास ठेउन स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी स्वत:च का उचलु नये? असे करणारा प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात नायक ठरेल आणि मृत्युनंतर स्वर्ग त्याची वाट पहात असेल.

ओडिसियस - अकिलिज, तुझा म्हणने पटले मला. मी जे केले ते बरोबर आहे का चुक यावर खुप वाद घालता येइल,प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल आणि ते त्यांच्यासाठी खरेही असेल.

अकिलिज – बरोबर. पण तुझे उत्तर काय? स्वर्ग का नर्क?

ओडिसियस - मित्रा, इथुन मी कुठेही जाऊ शकलो असतो , पण तुझ्याशी बोलुन मला आता कळाले आहे की मी स्वर्गातच आहे. हो ना?

अकिलिज – मित्रा, तुझं स्वागत आहे.

Monday, April 9, 2007

Call me a Joker , Call me a fool.....

केदारचा Disneyland वर लिहिलेला blog वाचला.
मग प्रथेप्रमाणे ट्रिपचे फोटो पुन्हा एकदा बघितले.
समीर पण तेव्हाच माझ्याकडे आलेला...त्याच्या बरोबर california ट्रिपचे किस्से आठवुन झाले.
आता याला Nostalgia पण नाही म्हणता येणार....अजुन सहा महिने पण नाही झाले.
पण सध्या मुड आहे खरा Nostaligic. मागचा पुर्ण आठवडा आजारपणामुळे घरी एकटा बसल्यामुळे असेल.
फोटो बघताना Mickey Mouse आणि Lion King बरोबर काढलेला फोटो दिसला.
आजकाल सगळ्या Amusement Park मधे असे Cartoons दिसतातच.
हे असे Cartoon बघितले की - त्या costume मागे कोण माणुस असेल ? असा प्रश्न पडतो.
तो पण हसरा खेळकर असेल?
हे काम करणे आवडत असेल त्याला?
असे दुसरे बनुन दिवसभर राहाणे...?
आपण दुसरे कोणी आहोत म्हणुन लोकांना आवडणे?

प्रत्येक Joker ची एक tragedy असते असं म्हणतात.
मनातल्या बरयाच गोष्टी लपवण्यासाठीच त्याच्या चेहेरयावरच रंगवलेले Permanent हास्य असेल कदाचीत.

एक गोष्ट आठवली कुठेतरी वाचलेली.कोणाची ते माहिती नाही.
एक असतो performer. वेगवेगळ्या करामती करुन लोकांचे मनोरंजन करणे हे त्याचे काम.
त्यातही "Rope Walk" ही त्याची speciality. नुसत्या अभिनयाने तो दोरीवर चालण्याचा आभास निर्माण करायचा.
चालणे,घसरणे - घाबरुन पुन्हा सावरणे,मधेच काही विनोदी हावभाव करणे - लोक खुप हसत, खुश होउन टाळ्या पिटत.
एक काळ असा होता की त्याचा खेळ हा "Star Attraction" असायचा.खास त्याचा खेळ बघायला लोक दुरदुरुन येत.
पण हे सगळे तो तरुण असताना. आता काळ बदलला. लोकांच्या आवडी बदलल्या.
त्याची आजारी बायको छोट्या मुलीला मागे सोडुन गेली.छोटीने पण आजारपणाशीच मैत्री केली.
आता कंपनीच्या मालाकाला "Rope Walk" चा कहीही उपयोग नव्ह्ता.
दोन खेळांमधला वेळ भरुन काढायला तो त्याला वापरत असे.लोकांचा पण प्रतिसाद कमी होत होता.
मालकाने त्याचा खेळ बंद करण्याचे सुतोवाचपण केले.
आज पुन्हा गर्दी जमली.खेळ सुरु.
आज त्याचा खेळ interval नंतर ठेवला होता. Interval नंतर लोक पुन्हा आपापल्या जागेवर बसेपर्यंत वेळ काढायला म्हणुन.
"Rope Walk" सुरु झाला. आज तो नेहेमीप्रमाणे जीव ओतुन अभिनय करत होता.
घसरण्याची trick आज त्याला चांगलीच जमली हे त्याला पण जाणवले.
पडतानाचे घाबरलेले हावभाव दाखवताना डाव्या कोपरयात कोणीतरी हासल्याचे त्याच्या कानांने टिपले.
ही त्याची जागा होती. इथे त्याला हमखास हशा मिळत असे.पण आज प्रेक्षकांकडुन प्रतिसादच मिळत नव्हता.
शेवटचाच खेळ आजचा.आज मालक काढुन टाकणार.खात्रीच होती त्याला.
निराश मनाने तो घरी आला.
घ्ररी छोट त्याची वाटच पहात होती.दिवसभर एकटी घरात बसुन कंटाळलेली होती.
तिने त्याला खेळण्याचा आग्रह केला. खुप थकला असुनही तो तयार झाला.
थोडे खेळुन झाल्यावर तिने त्याला "Rope Walk" करुन दाखवायला सांगितले.
याच्या पोटात गोळा आला. उद्या कोणते काम शोधत गावात फिरायचे याचा तो विचार करत होता...आणि आता पुन्हा "Rope walk" ?
पण मुलीचे मन नाही मोडवले त्याच्याकडुन.
"Rope Walk" सुरु झाला.
काही क्षणातच घर छोटीच्या हसण्याने भरुन गेले.डोळ्यात पाणी येइपर्यंत ती हसत होती आणि टाळ्या वाजवत होती.
तो पण सगळे विसरुन नविन नविन हावभाव करत होता - तिला हसवत होता.
आता तो फक्त एक performer होता आणि त्याच्या समोर त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रेक्षक होता - त्याची छोटी!

ग़ोष्ट इथेच संपते.ही ग़ोष्ट अर्धवट राहिली का?....सुखान्त आणि दुखान्त यांच्या मधे लोंबकळणारया बरयाचश्या ग़ोष्टीं सारखी? अश्या ग़ोष्टी अर्धवट नसतात.....मनात कोठेतरी त्या केव्हाच पुर्ण होतात....अर्थासकट!

Saturday, March 3, 2007

Chariots Of Fire

काल "Chariots Of Fire" पाहीला.
वॅन्जेलीसच्या ट्युनवरुन "Chariots...." सापडला आणि one-line-story वाचुन चांगला वाटला.
खुप चांगला, आवडला,ठीक आहे - यातले एक लेबल लावायाचे बाकी आहे. तसं लेबल लावण्याची काही घाई नाही आणि लावलेच पाहीजे असे पण नाही.
अब्राहम आणि एरिक. दोने English अथेलिट. Olympic रेस मधे जिंकण्याची दोघांची महत्वकांक्षा.
पण जिंकण्याचे motive मात्र वेगळे.
अब्राहम ज्यु असतो. ज्यु असल्याने जे सोसावे लागले त्याचा बदला त्याला सर्वोत्कृष्ट ठरुन घ्यायचा असतो.
एरिक एक missionary असतो. धावण्यातुन देवाशी नाते जोडु पाहणारा. Olympic नंतर चीन मध्ये जाऊन मिशनरीचे काम करायचे त्याने ठरवले असते.
पॅरिस olympic. 100m रेस रविवारी असते.
रविवार म्हणजे Sabbath - देवाचा दिवस.एरिक रेस मध्ये भाग घेण्यास नकार देतो.धर्माबद्दलची त्याची निष्ठा त्याला त्याच्या स्वप्नापेक्षा मह्त्वाची वाटते.
अब्राहम 100m रेस बड्याबड्यांना मात देऊन जिंकतो.
एरिक दुसरया दिवशी होणारया 400m रेस मधे भाग घेतो आणि पहिला येतो.
शेवटी दोनिही HERO जिंकतात.वॅन्जेलीसच्या music बरोबर picture संपतो.

सत्यघटनेवर आधारीत असलेला "Chariots..." बघुन काही tangent प्रश्न पडले -
धर्म माणसाच्या आयुष्यात किती मह्त्वाचा असतो?
धर्म आपल्यासाठी का आपण धर्मासाठी?
धर्माशिवाय आपण जगु शकतो का?
आपला धर्म आणि आपले आयुष्य एकमेकांना पुरक आहेत का?
का आपल्याला धर्माने बांधुन जखडुन ठेवले आहे?
या प्रश्नांना उत्तरे आहेत. पण बरयाच प्रश्नासांरखी प्रत्येकासाठी वेगवेगळी - ज्याचे त्याने स्वःतचे उत्तर शोधायचे.
धर्म एक Personal गोष्ट आहे. ती तेवढीच personal आणि harmless असावी.
प्रत्येक धर्म त्या त्या काळातल्या परिस्थिती नुसार घडला. काळ बदलला तसे धर्म बदलेले का?

Eric चुक का बरोबर?
त्याला वाटले त्याने चुक केली तर तो चुक.
त्याच्या नंतरच्या आयुष्यात त्याला केलेल्या गोष्टीचा कधीच पश्च्याताप झाला नाही तर तो बरोबर.

शेवटी तुम्ही स्वःताच्या मनाला कसे समजवु आणि फसवु शकता यावरच तुमचे सुख आणि दुःख अवलंबुन असते. हो ना?

Monday, February 19, 2007

पांढरया शुभ्र कागदावरचा सुर्यास्त

एक पांढरा शुभ्र कागद........
काही लिहायचे आहे? कविता , सुखांत असलेली एखादी गोष्ट?
नाहितर काळ्या पेन्सिलने चित्रच काढावे..... सुर्यास्त होत आहे आणि कोणीतरी एकटा सुर्याकडे पाहात बसलाय!
रंग नकोच चित्रामधे.....काळा आणि पांढरा पुरे.....संध्याकाळ जमली म्हणजे झालं.
संध्याकाळ....शब्दात आणि चित्रात न पकडता येणारी........

"य़े जिंदगीभी एक नशा है दोस्त. ज़ब चढता है तो पुछोना क्या आलम रेह्ता है लेकिन जब उतरता है तो..." देव आनंद आणि मग सुरु होणारे "दिन ढल जाये..." !!

पांढरया शुभ्र कागदावरचा सुर्यास्त.........कागदाचे काय- कविता , कथा काहिही चालते त्याला.
कागदाचे काम शब्दांशी....ते पोहोचले म्हणज झालं.
फार कोणाला कळेल असे काही उतरवु नये कागदावर......
कागद पण गुढ प्रश्न नाही विचारणार......हे असे का? ते तसे का? म्हणुन.

हा सुर्य असाच राहील.
हा कागदावरचा सुर्य बुडणार नाही , कागदावर अंधार होणार नाही....
....आणि कागदाच्या चौकटित अडकलेला सुर्य पुन्हा उगवणार पण नाही.