Sunday, June 1, 2008

अकिलिज Vs(?) ओडिसियस

अकिलिज - ओडिसियस कसा आहेस? तुला भेटुन आ‍नंद झाला. तुझ्या प्रवासाच्या खुप गोष्टी ऐकल्या मी. ट्रॉयच्या युध्दानंतर इथाकाला परत जाताना आलेले अनुभव – चित्र-विचित्र राक्षस, क्षणोक्षणी मृत्युला फसवणारे तुझे धैर्य – सारे अद्भुतच!

ओडिसियस - अकिलिज, का लाजवतो आहेस मला? एका साधारण माणसाची जगण्यासाठी केलेली धडपड ती – मांजर उंदराचा खेळ तो. चित्र-विचित्र राक्षसांशी लढताना, स्वत:च्याच सहकार्यांना धोका देताना , भिती, धैर्य या शब्दांचे अर्थच बदलणारी माझी गोष्ट. तुझ्यासारख्या स्वत: मृत्युला स्वीकारणाऱ्या समोर तर मला शरमुन जायला होते. तुला तर वरदान होते - ट्रॉयच्या युध्दात लढु नको आणि आणि जगातील सारी सुखे भोग आणि जर लढलास तर युध्द संपण्यापुर्वीच तुझा मृत्यु होइल पण जगात नेहेमीसाठी तुझी किर्ती अमर होइल.

अकिलिज – मित्रा , त्याला तु वरदान म्हणतोस? तो तर एक शाप होता. एक सैनिक असुन लढ्लो नसतो तर त्यानंतर मिळणाऱ्या जीवनात सुखी झालो असतो मी? आयुष्य तरि काय आहे - फक्त एक एक क्षण जोडणे? मी दुसरा पर्याय निवडला – लढण्याचा आणि मऱण्याचा - आणि हो लोकांच्या आठवणीत अमर होण्याचा.

ओडिसियस – पण तुला एक विचारु, मरणाला कवटाळ्याची तुझी इच्छा म्हणजे जगण्याशी केलेली प्रतारणा नव्हती का?

अकिलिज - मित्रा, क्षणोक्षणी साथ देणारे हे आयुष्य, शेवटच्या क्षणी आपल्याला मृत्युच्या स्वाधीन करते - या फसव्या जीवनाशी कसली आली आहे प्रतारणा? आपणच फसवले जात नाही का ?

ओडिसियस – खरं आहे. पण त्यामुळेच माझी जगण्याची धडपड तुला केविलवाणी वाटत नाही का?

अकिलिज- नाही वाटत. का ते नाही सांगत पण तुला उत्तर म्हणुन एक प्रश्न विचारतो. प्रत्येक वेळेस मृत्यु काही क्षणावर उभा असताना असा काय होतं जे तुला जगण्यासाठी खुणावत होते? न लढता मृत्युला स्वाधीन होणे सगळ्यात सोपे होते पण तरिही तसे करण्यापासुन तुला काय परावॄत्त करत होते?

ओडिसियस – माझी बायको आणि मुलगा इथाका मधे माझी वाट बघत होते आणि त्यांना भेटण्याची, त्यांच्यासोबत सुखात आयुष्या घालवण्याची इच्छा होती हे खरे आहे. पण केवळ हेच एक कारण होते असे मला आज वाटत नाही – अजुन काहितरी होते. मृत्युचा काळा जबडा दिसला की मला प्रकाश देणारा सुर्य आणि सुदंर सुर्योदय आठवायचा, समुद्राच्या साक्षीने बुडणारा सुर्यास्त आठवायचा, आकाशातील ताऱ्यांचा घुमट डोळ्यासमोर उभा रहायचा, नाजुक फ़ुले आणि त्यांचे रंग, पाऊस, वारा या आणि अश्या अगणित गोष्टी आठवायच्या. मला वाटते या साऱ्या गोष्टीच मला त्यांच्या पाशात अडकवित होत्या. मला न पाहिलेल्या मृत्युचे भय होते आणि पाहिलेल्या या जगाबद्द्ल प्रेम. तेच मला जगवत आले बहुतेक आणि त्यासाठी मी वेळोवेळी मोठी किंमत मोजली.

अकिलिज – तुला म्हणालो होतो ना मी, तुझे उत्तर तुला मिळेल म्हणुन.

ओडिसियस - अकिलिज, आपण दोघेही आता जीवन मरणाच्या पलिकडे गेलो आहोत. आज लोक आपल्याला ग्रीक गोष्टींचे नायक म्हणुन ओळखतात . मृत्युला निर्भयपणे कवटाळणारा तु आणि जगण्यासाठी काहीही करणारा मी – इतकी टोकाची परस्परविरुद्ध भुमिका असणारे आपण दोघेही नायक कसे? कोणाची भुमिका बरोबर कोण चुक?

अकिलिज - मित्रा, मृत्युला स्वीकारणे किंवा मृत्युला वारंवार फसावणे या कारणासाठी आपले महत्व नाहीच. जगताना लोक कधी मरणारच नाही असे समजुन जगतात आणि मरताना कधी जगलेच नाही असे भासवत रड्त, घाबरत मरतात. मित्रा, आपण नायक होतो आणि आहोत कारण जगणे, मरणे यापेक्षा आपण आपल्या मनाला जे पटले तेच केले. पुन्हा तशी वेळ आलिच तर मी लढण्याचा आणि मरण्याचाच पर्याय निवडेल आणि तु जगण्याचाच. आपल्या मनाशी प्रामणिक राहिलो हेच आपले कर्तुत्व.

ओडिसियस - अकिलिज, मृत्यु म्हणजे कर्माची समाप्ती. आपले पुर्ण जीवन आपल्या डोळ्यासमोर असते आणि आपण त्यातील काहीच बदलु शकत नाही. चुक-बरोबर,चांगले-वाइट यांची गोळा-बेरिज होते आणि शेवटी कहीतरी उरतेच. हे जे उरलेले असते ते जर समाधान देणारे असेल तर तो स्वर्ग आणि हेच जर सतावणारे असेल, मन खाणारे असेल तर तो नर्क! जगताना क्षणोक्षणी आपल्याला हे बदलण्याची संधी असते – पण मृत्यु नंतरच माणसाला याची सत्यता पटते.

अकिलिज – बरोबर आहेस तु. आपल्या मनामध्येच स्वर्ग आणि नर्क आहे याची जगताना माणसाला जाणिव नसते. पण अश्या अनेक गोष्टी त्याला माहिती नसतात – आपण का जगतोय? कशासाठी मरतोय? सगळा अंधारातील प्रवास. जगण्याला अर्थ आहे का नाही? कोण देणार याचे उत्तर? डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असते? का सगळे आपल्या मनाचे खेळ ? सगळ्याला अर्थ देणारे जर आपले मनच असेल तर मग या जगण्याला पण आपणच अर्थ का देऊ नये? स्वत:वर विश्वास ठेउन स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी स्वत:च का उचलु नये? असे करणारा प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात नायक ठरेल आणि मृत्युनंतर स्वर्ग त्याची वाट पहात असेल.

ओडिसियस - अकिलिज, तुझा म्हणने पटले मला. मी जे केले ते बरोबर आहे का चुक यावर खुप वाद घालता येइल,प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल आणि ते त्यांच्यासाठी खरेही असेल.

अकिलिज – बरोबर. पण तुझे उत्तर काय? स्वर्ग का नर्क?

ओडिसियस - मित्रा, इथुन मी कुठेही जाऊ शकलो असतो , पण तुझ्याशी बोलुन मला आता कळाले आहे की मी स्वर्गातच आहे. हो ना?

अकिलिज – मित्रा, तुझं स्वागत आहे.