एक गोष्ट अर्धवट राहिलेली
सुरूवात झालेली आणि शेवट माहिती असलेली
पण मधेच थोडी अडखळलेली-भांबावलेली आणि दुखावलेली सुद्धा
शब्दांच्या डोंगरातुन मूकपणे काही सांगणारी
घटनांच्या श्रुंखलात राहुनही मुक्त असणारी
सुरूवात आणि शेवट यांच्या मधेच अडकलेली गोष्ट पूर्ण कशी करावी?
शब्दांनी,भावनांनी,घटनांनी की नुसत्त्याच चित्रांनी मधली जागा भरावी?
तशी तिला शेवटापर्यंत जाण्याची घाई नाही
"अरे वा!" किंवा "अरे रे!!" यांचं आकर्षण नाही
छोट्या निरर्थक घटनांचा राग नाही
मोठ्या अवघड शब्दांचा सॊस पण नाही
पण गोष्टीतला प्रत्येक शब्द मात्र आरश्याचा तुटलेला तुकडा असावा,
खुपला टोचला तरी स्वत:चा ’एकच’ चेहरा त्यात दिसावा
एक गोष्ट प्रामाणिकपणे पूर्ण होण्याची वाट बघणारी
सुरूवात झालेली आणि शेवट माहिती असलेली.